उबर वापरणारे रिक्षाचालक एप्रिलपासून मीटरप्रमाणे व्यवसाय करणार   

पुणे : नवीन करारानुसार यापुढे उबेर जे दर दाखवेल ते रिक्षाचालकांवर बंधनकारक नसून ते फक्त सूचक असतील. त्यामुळे भाडेदर ठरवण्याचा अंतिम अधिकार रिक्षाचालकांना असणार आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील सर्व रिक्षाचालक उबर प्रवाशापर्यंत पोहोचल्या नंतर मीटर टाकून मीटरने प्रवाशांना सुविधा देतील, त्यानुसारच पैसे आकारतील, अशी माहिती महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी दिली. 
 
डॉ. क्षीरसागर म्हणाले, १८ फेब्रुवारी २५ पासून उबरने लाखो रिक्षाचालकांबरोबर नवीन करार केले आहेत. नवीन करारानुसार उबर व रिक्षा चालक यांचा एकमेकांशी असलेला कायदेशीर संबंध बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या करारानुसार कंपनी रिक्षाचालकांकडून कोणतेही कमिशन घेणार नाही. मात्र कंपनीने दिलेले सॉफ्टवेअर वापरण्यासाठी ठराविक नेमून दिलेली फी दररोज घेईल. रिक्षाचालक व प्रवासी यांच्यामध्ये कंपनी कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही. रिक्षाचालकांनी सरकारच्या नियमाप्रमाणे सर्व कायदे पाळणे अपेक्षित आहे. यापुढे रिक्षाचालक व कंपनीमध्ये, मालक नोकर किंवा सर्विस प्रोव्हायडर व ग्राहक असे कोणतेही संबंध तयार होणार नाहीत. कामगार कायदे तसेच ग्राहक कायदे कंपनीला लागू असणार नाहीत असे सदर करारात कंपनीने नमूद केले आहे.
 
यापूर्वी उबरवर रिक्षाचे दर कार्यालयीन वेळेत किंवा पाऊस आल्यावर सर्ज प्राईसिंगमुळे अचानक वाढत होते, ज्यामुळे प्रवाशांचे आर्थिक नुकसान होत होते तसेच रिक्षाची मागणी कमी असणार्‍या वेळांमध्ये अचानक दर कमी होत होते. ज्यामुळे रिक्षाचालकांचे नुकसान होत होते. या दोन्ही गोष्टी आता बंद होतील. कंपनीने करारात जरी बदल केला असला तरी प्रत्यक्षात मोबाईल एप्लिकेशनवर कोणताही विशेष बदल केलेला नाही. बहुदा येत्या काळामध्ये कंपनी एप्लीकेशन मध्येसुद्धा त्यांनी दिलेल्या करारानुसार बदल करेल. नागरिकांच्या जनजागृतीसाठी रिक्षाचालक यांनी कराराची प्रत रिक्षात ठेवून नागरिकांना नवीन बदलाबाबत रिक्षाचालक सजग करत असल्याचेही डॉ. केशव क्षीरसागर यांनी सांगितले. 

Related Articles